Sunday, 10 April 2016

महात्मा जोतिबा फुले


महात्मा जोतिबा फुले  (जोतिबा गोविंदराव गोऱ्हे ) यांच्या १८९ जयंती निमित्त विनम्र अभिवादन

जन्म : ११ एप्रिल १८२७ - मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०


जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

बालपण आणि शिक्षण:-
जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले.प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य:-
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.” ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ ” हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती.‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। “

रूढीवर टीका : –
समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके : –
जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात. हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत. एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच. समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

अश्वमेधाचा घोडा : –
वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

फुले महात्माच : –

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.

जोतीरावांची सत्यशोधक चळवळ :-

सामाजिक समता म्हणजे ब्राह्मणापासून अस्पृश्य समजल्या जाणा-या सर्व पुरुषांची समता असा संकुचित अर्थ जोतीरावांना अभिप्रेत नव्हता. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी त्यांना धारेवर धरले…. विसाव्या शतकातील महाराष्ट्राचे इतिहासकार य. दि. फडके यांनी सत्यशोधक चळवळ आणि त्यावरील महात्मा फुलेंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यांचा गोषवारा घेतला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापन करण्यापूर्वी जवळजवळ पंचवीस वर्षे जोतीरावांनी नानाविध स्वरूपाची लोकसेवा केली होती. मुलींना आणि अस्पृश्यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुण्यात शाळा काढल्या. तसेच विधवाविवाहात विघ्ने आणणा-या कर्मठ सनातन्यांपासून उच्चवर्णीय सुधारकांचे रक्षण केले, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापन केली आणि एका अनाथ मुलाला स्वतःचा मुलगा मानून त्याला लहानाचा मोठा केला.
आपल्या घरचा हौद अस्पृश्य समजल्या जाणा-यांना खुला केला. ‘ सत्यदीपिका ‘ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारख्या ख्रिस्ती मिशनरी आणि ज्ञानोदयासारख्या मिशन-यांच्या मुखपत्राने जोतीरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली. त्यामुळे जोतीराव फुले हे ख्रिस्ती मिशन-यांचे हस्तक, अशी गोपाळराव आगरकरांसारख्या सुधारकाग्रणीचीही समजूत होती. जोतीरावांच्या विचारावर टॉमस पेन यांच्या धर्म व समाजविषयक विचारसरणीचा फार प्रभाव होता. जोतीरावांनी वैदिक किंवा आर्यांच्या परंपरेवर झोड उठवली. अनार्यांच्या वैदिक परंपरेपासून प्रेरणा घेतली. त्यांनी केवळ जन्माधिष्ठित जातिव्यवस्थाच नाकारली असे नव्हे तर सबंध चातुर्वर्ण्य व्यवस्थाच अन्याय्य व विषम असल्याने त्याज्य ठरवली. जोतीरावांचे एक समकालीन लोकहितवादी यांनीही पुराणातील भकडकथांची चेष्टा केली, पण वेदांविषयी त्यांना आदर होता.
याउलट श्रृतिस्मृति, शास्त्रे, पुराणे वगैरे आर्य भटांनी रचलेले भारेच्या भारे ग्रंथ म्हणजे ब्रह्मकपट आहे, असे जोतीराव म्हणत. ‘ त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्तः निशाचराः ‘ हे बृहस्पतींचे वचन अनेकदा उद्धृत करीत. सिद्धाचार्य अश्वघोष या लेखकाने रचलेल्या वज्रसूची या ग्रंथाच्या संस्कृत बृहत्पाठाचा अनुवाद तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई, शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनी केला होता. वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी ‘ एक हिंदू ‘ या टोपण नावाने ‘ जातीभेदविवेकसार ‘ ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘ बिप्रमती ‘ हा भाग जोतीरावांना आवडत असे. कबीराचा हा ग्रंथ त्यांनी कबीरपंथी ज्ञानगिरीबाबा यांच्याकडून समजावून घेतला होता. ख्रिस्ती धर्मोपदेशकांप्रमाणेच हे ग्रंथही जोतीरावांच्या प्रेरणेचे स्रोत होते. सत्यशोधक समाजात सभासदाला प्रवेश देताना तळी उचलावी लागत असे. तळीचे सामान म्हणून एका पिशवीत भंडारा, गुलाल, गुळाचा खडा, खोब-याच्या वाट्या, धने, विड्याची पाने, सुपारी वगैरे जिनसा ठेवलेल्या असत. तळी उचलताना खंडोबा, बहिरोबा वगैरे वीरांच्या नावे चांगभले किंवा येळकोट असा पुकारा केला जात असे. सत्यशोधक समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ख्रिस्ती धर्मोपदेशकांशी घनिष्ठ संबंध असले तरी त्यापैकी कोणी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याचे आढळत नाही. सत्यशोधक समाजाची चळवळ ही मूलतः धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारी चळवळ होती. सत्यशोधक समाजाच्या नियमांनुसार सभासदांना राजकीय विषयाची चर्चाही करता येत नसे. १८७७ साली समाजाने महारमांगांची दुःखे व दुष्काळ या विषयावर निबंध व वक्तृत्वस्पर्धा घेतल्या तेव्हा चिटणीस या नात्याने जोतीरावांनी स्पर्धकांना जाहीर इशारा दिला होता, ‘ या विषयावर ( म्हणजे राजकारणावर) कोणी उमेदवार लिहील किंवा बोलेल तर त्याचे भाषण लागलेच बंद केले जाईल ‘ .
न्यायी, उदार, निष्पक्षपाती इंग्रज राजवटीवरील सत्यशोधकांच्या निष्ठेमुले आणि राजकारणापासून अलिप्त राहण्याबद्दल त्यांचा कटाक्ष असल्यामुळे इंग्रजांच्या पलटणीतील सैनिकांना उद्देशून मतप्रचार करण्याची सत्यशोधकांना मुभा दिली जात असे. एवढेच नव्हे तर लष्करातील व पोलिसातील कर्मचारी सत्यशोधक समाजाचे सभासद होऊन कार्य करू लागल्यास इंग्रज सरकारने त्यांना कधी आडकाठी आणली नाही. भटभिक्षुकांच्या लबाड्या, मद्यपानाचे दुष्परिणाम, विद्यार्जनाचे महत्त्व वगैरे विचार निरक्षर लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभंग, ओवी, पोवाडा, आरती, मंगलाष्टक, कटाव, लावणी, नाटक, कीर्तन वगैरे बुहसंख्य लोकांना ओळखीच्या असलेल्या वाड्मयप्रकारांचा सत्यशोधकांनी परिणामकारक वापर केला. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे तेव्हा निबंध हा वाड्मयप्रकार मराठीत रुजू लागला होता. ‘ शेतक-यांचा आसूड ‘ हा एक विस्तृत निबंध वगळता अशा प्रकारचे लेखन जोतीरावांनी केले नाही. कारण ते ज्यांच्यासाठी लिहित होते त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लफ्फेदार, ऐटबाज व संस्कृतप्रचुर निबंधांपेक्षा मराठमोळे काव्य व संवाद अधिक प्रिय होतील हे त्यांना माहीत होते. खेड्यातील शेतक-यांना फसवणारा व निरक्षऱ पाटलाला मुठीत ठेवणारा कलमबहाद्दर ब्राह्मण कुलकर्णी हे एक सत्यशोधकांच्या मा-याचे महत्त्वाचे लक्ष्य होते. ‘ गावगुंड अडमुठा, लुटीतो कुळकर्णी पठ्ठा ‘ या कृष्णाजी पांडुरंग भालेकरांनी लिहिलेल्या लावणीच्या धृपदात किंवा त्यांनीच १८७७ साली लिहिलेल्या बळीबा पाटील नावाच्या ग्रामीण कादंबरीत कुळकर्ण्याविषयीचा शेतक-यांना वाटणारा संताप उफाळून बाहेर येताना दिसतो. सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन, पदरमोड करून भालेकरांनी पुण्यात १८७७ साली ‘ दीनबंधू ‘ पत्र सुरू केले तेव्हा त्यांना अवघे १३ वर्गणीदार मिळाले.
जोतीराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असले तरी ते म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार सत्यशोधक चळवळीत आरंभीच्या काळातही नव्हता. वैयक्तिक मतभेदामुळे, स्वभावभिन्नतेमुळे, हेव्यादाव्यांमुळे, नेतृत्वासाठी चालणा-या स्पर्धेमुळे तसेच वैचारिक मतभेदांमुळे सत्यशोधक चळवळीत वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असत. स्त्री पुरुष समतेबद्दलची फुल्यांची मते लोखंडे व भालेकर यांना मान्य नव्हती. ‘ स्त्री पुरुष तुलना ‘ नावाचे पुस्तक बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी लिहिले तेव्हा लोखंडे व विशेषतः भालेकर यांनी या पुस्तकावर कडाडून टीका केली. त्यावेळी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई या स्त्रियांची कड घेऊ जोतीरावांनी खरमरीत शब्दांत आपल्या अनुयायांची हजेरी घेतली आणि त्यांचे कान उपटले. रानड्यांच्या आधी कितीतरी वर्षे जोतीरावांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाईस शिकवून त्यांना शिक्षिका म्हणून आपल्या कामात सहभागी करून घेतले होते. घराबाहेर समतेचा आग्रह धरणारे पुरुष घरात समता येऊ देण्यास तयार नसतात. असे पुरुष आपल्या अनुयायांमधे दिसताच जोतीरावांनी ‘ इशारा ‘ , ‘ सत्सार ‘ अंक १ व २ वगैरैंमधून त्यांना धारेवर धरले. रमा, तारेस शिकवायला जाणा-यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणे लग्नाच्या भार्येस घरातले घरात आधी विद्वान करावे, असे जोतीरावांनी त्यांना खडसावले.
१८९० साली जोतीराव कालवश झाले. १८९६-९७ ते १९०२ पर्यंतच्या काळात दुष्काळ व प्लेग यांनी थैमान घातले असताना अनेक सत्यशोधक मृत्युमुखी पडले. सावित्रीबाई फुले व नारायणराव लोखंडे यांचे प्लेगने बळी घेतले. व्यंकू बाळोजी कालेवार, जाया काराडी लिंगू, विश्राम रामजी घोले इत्यादि प्रमुख सत्यशोधख १९०२ पूर्वी कालवश झाले. मुंबई आणि पुणे शहरांतील सत्यशोधक समाजाचे काम थंडावल्यासारखे वाटले तरीही ती चळवळ ग्रामीण भागात मूळ धरू लागली. १८९९ सालापासून नारायण बाबाजी पानसरे उर्फ नारो बाबाजी महाधट आणि धर्माजी रामजी डुंबरे पाटील या जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या दोघा समाजसेवकांनी चळवळीचे लोण खानदेशात, व-हाड मध्यप्रांतात नेण्यास सुरुवात केली.

पश्चात प्रभाव :-
पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतीबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.

साहित्य आणि लेखन:-
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

1 comment:

  1. विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली | नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |

    वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले!
    -- महात्मा जोतिबा फुले

    ReplyDelete